मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

कवितेचे शीर्षक - वासा (वारा - सावली)

वासा (वारा- सावली)

तुमच्या दांपत्याच्या नावात
आहे एक खरीच जादू ,
जाता जिकडे तिकडे
मनी असतो विचार तो
की सामाजिक कार्य पाहू...
धर्म जाणता तुमचा कळे
जाता येता गोड बोलणे ,
कर्म पाहता दिसून येते
आपुलकीच्या नात्याने
माणसास माणूस जोडणे .....
नाही करत आपण हे सर्व
आपल्या नाव लौकिकतेसाठी ,
दीन दुबळ्यांसाठी तुम्ही
सदैव तत्पर उभे राहता पाठी.....
नावातच तुम्हा दोघांच्या
आहे एक वेगळीच किमया ,
धावे  वादळापरी तो
खंबीरतेचा *अनिल* (वारा)
नि दिसे सहकार्याची *छाया* (सावली).....
मिळो अशीच साथसोबत
राहावी ही अशीच माया ,
एवढेच मागणे आहे माझे
चरणी तुझ्या हे देवराया...
🖋 *काव्यलेखन-* 🖋
*विपुल उत्तम आढाव (मुंबई)*
*9969981918*

कवितेचे शीर्षक - शाळेचा लळा

कवितेचे शीर्षक - शाळेचा लळा

आम्ही आता लहान मुलं
शिकतोय शाळेत नवीन काही ,
घरातील आईची माया आता
शाळेत करतात आमच्या बाई...

हाताला पकडून शिकतोय अक्षर
घडवता तुम्ही भावी साक्षर
देऊनी शिक्षण नैतिक मूल्यांचे
सार्थक होते जीवन चिमुकल्यांचे...

करुनी शिक्षण आकर्षित , आनंदी
बागडू आम्ही पण खूप स्वच्छंदी..
रचूनी पाया आमच्या जीवनाचा
निर्माता तुम्ही यशस्वी भाग्याचा....

म्हणूनच म्हणतो आम्ही आता
शाळेत येतोय घरी न राहता
फुलवू आनंदी ज्ञानाचा मळा
तुमचा नि शाळेचा लागलाय लळा...

*✍🏻श्री. विपुल उत्तम आढाव✍🏻*

हायकू रचना - आनंदी क्षण


हायकू रचना - आनंदी क्षण

आनंदी क्षण
शुभेच्छा वर्षावांनी
भारुनी मन           ||१||

मनी दिसावा
स्वप्न पूर्ती सुखाचा
स्वर्ग असावा           ||२||

खग तू व्हावे
अमर्याद ऊर्जेचे
पंख लाभावे            ||३||

गाठूनी आज
वयाची ती पन्नाशी
सुवर्ण साज            ||४||

जीवन पर्व 
जग उत्साहपूर्ण
स्वीकार सर्व             ||५||

सुख असावे
अनुभव सागरी
तट दिसावे               ||६||

अनुभव हे
जीवनी प्रवासात
मार्गी शोध घे            ||७||

जग हे विश्व
अनुभव सागरी
सावर अश्व              ||८||

देतो मी आज
हा शब्द सुमनांचा
सदिच्छा साज           ||९||

मिळावा तुला
तृप्ततेचा किनारा
अपेक्षा मला              ||१०||

*✍🏻श्री. विपुल उत्तम आढाव(मुंबई)✍🏻*

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

बालगीत - माझी आजी

 बालगीत - माझी आजी

माझ्यासारख्या लहानांच्या
मनात व्यक्ती खास ,
गाणी - गोष्टी ऐकतच
भरविते एक - एक घास

वयाने आहे मोठी
पार केली साठी ,
बाहेर जाताना मला
म्हणते मला काठी

देवळात जाता ती
फुले देतो आणून मी ,
अलगद हात फिरवूनी
जाते आशीर्वाद देवूनी

आई कधी ओरडताना
बनते माझी ढाल ,
चिडू नकोस त्याच्यावर
म्हणे सांगितले ना तुला काल ?

बाबा जेव्हा चिडतात
माझ्या डोळ्यात येतं पाणी ,
रुसवा माझा काढताना
म्हणते माझ्यासाठी गोड गाणी

शाळेतून घरी येताच
जवळ मला घेते ,
गुणाचं गं... बाळ माझं
म्हणत पापी माझी घेते

अशी ही खेळकर
मैत्रीण आहे आजी ,
प्रेमळ बोटीची सफर
घडविणारी नाविक माझी

*✍️श्री. विपुल उत्तम आढाव✍️*

कवितेचे शीर्षक - पुस्तक काही तरी सांगू पाहतंय....

कवितेचे शीर्षक - पुस्तक काही तरी सांगू पाहतंय....

आज धावपळीच्या या जगात
अनेकांशी माझा संपर्कच तुटलाय
तंत्रज्ञान वापरून यशस्वी माणसाला
पुस्तकांचा खरा ध्यासच सुटलाय
म्हणूनच मनातील दुःख सलत राहतंय
पुस्तक काही तरी सांगू पाहतंय....

अनेकांच्या विचारांचा आहे साठा
समस्या निराकरणाच्या माझ्यात वाटा
समृद्ध वाचनाने लाभणारा स्वर्ग
पूर्वीच्या पिढीने जाणला मार्ग
आज मात्र मला विरूद्ध चित्र दिसतंय
पुस्तक काही तरी सांगू पाहतंय....

ज्ञान - विज्ञानाचा मीच संग्रह
जाणवतो आहे प्रत्यक्ष दुराग्रह
बंद कपाटात ठेवलंय मजला
आवरण मात्र धुळीने सजला
आता डोळ्यांतून अप्रत्यक्ष पाणी वाहतंय
पुस्तक काही तरी सांगू पाहतंय....

कथा , कादंबरी , कविता , नाटक
वाचण्यास माझे अनेक प्रकार
निबंध , समीक्षा , चरित्र , आत्मचरित्र
अनुभवातून मिळवी मज आकार
पण मौलिक ज्ञान ते बंदिस्तच राहिलंय
पुस्तक काही तरी सांगू पाहतंय....

तंत्रज्ञानाचा वापर करावा तुम्ही
विरोध नाही माझा त्याला
बाह्यदुवे शोधताना मला आठवा
वाचून मला इतरांना सोपवा
इथं एकांतपणा मला खावू पाहतंय
पुस्तक काही तरी सांगू पाहतंय....

लहानपणापासून मित्र मी तुमचा
हास्य , रहस्य , विनोदी छटांचा
बोध देवूनी घेई ठाव वयाचा
पर्याय मी ठरतो शीणपणाचा
आज जीवन तुमच्याविना अपूर्णच राहतंय
पुस्तक काही तरी सांगू पाहतंय....

पुन्हा नव्याने सुख अनुभवेन
हातात तुमच्या येताच फुलेन
व्यथा माझ्या दूरवर सोडेन
सुखाने आयुष्य तुम्हांसवे काढेन
ह्याच आशेचं मनात काहूर दाटतंय
पुस्तक एवढंच तुम्हांला  सांगू पाहतंय....

*✍️श्री. विपुल उत्तम आढाव✍️*

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

बालगीत - आवडीची सुट्टी

बालगीत - आवडीची सुट्टी

सहा दिवस
माझी शाळा ,
अभ्यासाला नसतो
कधीच टाळा

सोमवार येताच
शाळा होते सुरू ,
वेळापत्रक लागतो
अभ्यासाचं करू

मंगळवारी करतो
कविता पाठ ,
नाचायचा माझा
असतो थाट

बुधवारचा दिवस
वाचतो मी धडा ,
गुरुवार येताच
म्हणतो पाढा

शुक्रवार माझ्या
कलांचा दिवस ,
दिवसभर लावतो
कौशल्यांचा कस

शनिवार देतो
तपासायला वह्या ,
पानांवर लालसर
दिसतात सह्या

सहा दिवस अशी
चालते ही शाळा ,
म्हणूनच मला
येतो कंटाळा

रविवार म्हणजे
खेळाशी बट्टी ,
अशी ही माझी
आवडीची सुट्टी

✍️श्री. विपुल उत्तम आढाव✍️

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

कवितेचे शीर्षक - झुगझुग गाडी , मोठी झाली....

कवितेचे शीर्षक - झुगझुग गाडी , मोठी झाली....

सरली माझी 167 वर्ष
सुरू होऊनी इथे मला
जन्म माझा भारतात हो
16 एप्रिल , 1853 ला

ब्रीदवाक्य हे माझे असे
देशाची जीवनवाहिनी मी
मुंबई ते ठाणे पहिले अंतर
21 मैलाचे गाठीले मी

सुरुवातीला इंजिन माझे
तप्त अशा त्या वाफेचे
औपचारिकता दिसून आली
भारतातल्या या रेल्वेचे

बनून आले एक परी मी
बचत झाली वेळेची
एकावेळी किती जण ही
ये - जा होई साऱ्यांची

रूप माझे हे वेगवेगळे
नाव ही देई वयानुरूप
कार्य माझे कधी न थांबे
न बदले स्वतः स्वरूप

कुणी म्हणे रेल्वे मजला
कुणाची आगगाडी मी होते
चिमुकल्यांची झुकझुक गाडी
वेगाने खेळात मी धावते

आज आहे थोडी दुःखी 
सांगते मी तुम्हा व्यथा
परिवर्तनाचा विचार व्हावा
ऐकुनी घ्या माझी कथा

अस्तित्व माझे तुम्हामुळे हे
जाणुनी आहे मी सर्व
निर्जीव म्हणुनी तुडवी कोणी
पायदळी माझे हो कर्म

वाहीते रोज मर्यादे बाहेर
तुम्हास उदरात घेते
वेळ पाळूनी रहायचे हो
विचार मनी बाळगते

थुंकुनी या माझ्या देहावरती
प्रवास तुम्हीच करता कसा ?
तुम्हां प्रमाणे मी ही आता
स्वीकारू पाहते स्वच्छतेचा वसा

 दिवस - रात्र मी तत्परतेने
मी सदा धावेन तुमच्यासाठी
माझ्याही भावनेचा विचार करावा
हीच विनवणी आपुल्यासाठी

✍🏻 विपुल उत्तम आढाव ✍️

कवितेचे शीर्षक - बोलता - बोलता

कवितेचे शीर्षक - बोलता - बोलता

असं वाटतं तू सोबत असल्यावर
निघून जावं असच पटकन आयुष्य ,
तू नसल्याची जाणीव होण्याआधीच
भकास वाटेल सारे माझे भविष्य

जीवनाच्या वाटेवर आपण दोघे
चालू हळू देता साथ सोबत ,
आलेल्या संकटावर आपण मात करू
जीवनी येईल कशाला , कुठली नौबत ?

खट्याळ , प्रेमळ , साधा
आपुला ठेवूया स्वभाव ,
आपलेपणाची झालर त्याला
कधी लाजरा तो भाव

तुला माझी नि माझी तुला
असावी गोडी नि भेटीस आतुर ,
जीवनी आपण गीत गावे
जुळवू संगीत सप्त सूर

भाषा विरहाची दूर व्हावी
मनी नसावी कधी आपुला द्वेष ,
मिलनाची ती तृप्तता यावी
पुसून जावी हृदयातील आंतररेष

असंच वाटतं आपण बोलता - बोलता
आयुष्यात ती संध्याकाळ यावी ,
एकमेकांचे हात हातात घेता
प्रेमाची ती सुखद बाग फुलावी

*✍️ श्री. विपुल उत्तम आढाव✍️*

कवितेचे शीर्षक - तुझे बोल...

 कवितेचे शीर्षक - तुझे बोल...

ओठांवर राहिले अपुरे
फक्त तुझे बोल ,
अबोल प्रितीचे दार
तूच प्रिये खोल

द्वेष तुझ्या - माझ्यात
हा कधीच नव्हता ,
वाळवंटातील मृगजळाचा
खेळ वाटत होता

विरहाच्या तुझ्या जाणीवेने
होणाऱ्या माझ्या वेदना ,
या वेड्या मनाच्या कुणी
ऐकेल का यातना ?

हृदयरूपी समुद्र आहे
त्या आठवणींचा किनारा ,
पाखरासम घेईन मी
तुझ्या काळजात निवारा

सहवासाच्या आठवणींना आठवत
वाचतोय प्रेमाच्या पत्रांना ,
वाचताना सुख ओलावते
अश्रूंनी माझ्या नेत्यांना

*✍🏻श्री. विपुल उत्तम आढाव✍🏻*

कवितेचे शीर्षक -आयुष्याच्या खेळात

कवितेचे शीर्षक - आयुष्याच्या खेळात

आयुष्याच्या खेळात कधीही काहीही होत असतं ,
कुणाचा डाव कधी पलटेल निश्चित काही नसतं.

पुढे जाणारा अवचित कधी घेईल माघार ,
चंद्र जरी रुसला तरी साथ देईल अंधार.

आयुष्याच्या खेळात नेहमी हसणं - रडणं असतं ,
धडपडण्याच्या सवयींमुळे कधी स्वस्थ बसणं नसतं.

क्षिताजाची रेषा कधीच स्पर्श नाही होणार ,
जिंकण्याची आस मात्र अशीच हुलकावणी देणार.

जगणारा जगतो, मारणारा मरतो होतंच असतं ,
चेहऱ्यावर हसू असूनही मनातील दुःख संपणार नसतं.

विश्वातील प्रत्येकाच्या आयुष्याच्या खेळात असंच होणार ,
दुःखातूनच सुखाची किरणे शोधत डाव पुढे येणार.

✍️ श्री. विपुल उत्तम आढाव ✍️

कवितेचे शीर्षक - मीच माझा...

कवितेचे शीर्षक - मीच माझा...

असाध्य ते साध्य करण्याच्या विचाराने
अनोळखीतून ओळखीच्या वाटा शोधत
निर्माण करत गेलो मार्ग मीच माझा...

कधी खटक्याचे बोल खात भावनिकतेने
मनाची मनालाच स्वतः समजूत घालत
सामंजस्याची क्षमता वाढवत गेलो मीच माझा...

सहवासाची उणीव भासल्यास एकांतात
निरामय शांततेतून संवाद साधत
शिकू लागलो प्रगटीकरण वृत्ती मीच माझा...

हृदयाला लागलेली ठेच आठवता
आपली तशीच इतरांची भावनिकता
जपत गेलो नि भावनिक बनलो मीच माझा...

कुणी सोबत असो वा नसो
मनातील विचार, भावना कागदावर मांडत
स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यास शिकलो मीच माझा...

✍️ श्री. विपुल उत्तम आढाव ✍️

कवितेचे शीर्षक - भिमाईच्या पोटाला...

कवितेचे शीर्षक - भिमाईच्या पोटाला...

*भारताचा रत्न तू,*
*ज्ञानाचा सूर्य तू...*
*समाजाचा उद्धारक,*
*लेखणीचा संपादक...*
*अन्यायाचा मुक्तिदाता,*
*न्यायाचा तू विधाता...*
*नवयुगाचा युगंधर,*
*दलितांचा तू आधार...*
*साऱ्या विश्वाचा रत्न तू ,*
*उच्च विद्या विभूषित तू...*
*पंखदाता तू पाखरांचा ,*
*संहारक तू वेदनेचा...*
*जाणीवतेची चेतना तू ,*
*जाणल्यास यातना तू...*
*असा एक विचारवंत ,*
*आम्ही ठरलो भाग्यवंत...*
*ज्ञानाचा महामेरू गाठला ,*
*संसार पुस्तकांशी थाटला...*
*शास्त्रज्ञ तू समाज मनाचा ,*
*शिल्पकार तू संविधानाचा...*
*जन्म ज्याने घेतला ,*
*१४ एप्रिल १८९१ ला...*
*असा १४ वे रत्न जन्मला,*
*रामजी - भिमाईच्या पोटाला...*

*✍🏻श्री. विपुल उत्तम आढाव✍🏻*

कवितेचे शीर्षक - अजूनही ...

कवितेचे शीर्षक - अजूनही ...

हे मन दुखावते माझे अजूनही ,
दुःख न माझे सरले अजूनही...!

लहान - मोठी दुःखे खूप साहिली ,
सुख न जिंकले मी अजुनही...!

मी व्यक्त होत राहिलो वेड्यापरी ,
त्या भावना न थकल्या अजुनही...!

सहवास हा सोडला मी तुझ्यासाठी ,
पण तू न सोडलास अबोला अजुनही...!

मी थांबतो, त्यांना सक्रिय करा ,
ज्यांनी अनुभवले नाही भावविश्व अजुनही...!

हरवलेले प्रेम पुन्हा आले जीवनी ,
हिंमतीने नजर भिडली नाही अजुनही...!

विचारच न केलेला बरे असे वाटे , 
विचारांशिवाय मन जगतच नाही अजूनही...!


✍️ श्री. विपुल उत्तम आढाव ✍️

कवितेचे शीर्षक - तू जीवनातून गेल्यावर...

कवितेचे शीर्षक - तू जीवनातून गेल्यावर...

तू जीवनातून गेल्यावर...
व्यक्त झालो शब्दांतून
समजतात मला कवी ,
भावनिक म्हणून रुजलो
त्या वाचकांच्या मनी

तू जीवनातून गेल्यावर...
रुसले होते सूर
हरवत गेले गाणे ,
शब्द कोड्यांत गुंतलो
भरले रिकामे रकाने

तू जीवनातून गेल्यावर...
एकटा पडलो मी
या जगापासून सारा ,
बनून राहिलो जणू
आकाशातील मी तारा

तू जीवनातून गेल्यावर...
आता मजकडे उरला
केवळ आठवणींचा पसारा ,
भरकटलेल्या लाटांवरूनी
शोधतो आहे किनारा

✍️ श्री. विपुल उत्तम आढाव✍️

कवितेचे शीर्षक - त्या दिवसांत...

कवितेचे शीर्षक - त्या दिवसांत...

जेव्हा अशा संकटांच्या दिवसांत ,
अनेक अनोळखी ओळखीसम भेटतात...

बोलण्यातून संवाद वाढत जातात ,
संवादातून विचार मनाला भिडतात...

मनाला भिडलेले करून प्रत्यक्षात ,
कृतीतून स्पष्ट व्यक्त होतात...

हृदयात अलगद स्पंदन वाढतात ,
नकळतपणे ते तिथेच ते रमतात...

पुन्हा जगण्याच्या माझ्या दिवसांत ,
अविस्मरणीय त्या आठवणी स्मरतात...

✍️ श्री. विपुल उत्तम आढाव ✍️

कवितेचे शीर्षक - तुझी साथ

कवितेचे शीर्षक - तुझी साथ

कधी दूरवर पाहता
क्षितिजाची जाणीव होई ,
मन विचारात गुंतता
तुझीच आठवण येई

येता आठवण तुझी
मन स्वतःतच रमवी ,
तुझ्या गोड आठवणी
हृदयास माझ्या हसवी

गंध दरवळे फुलांचा
त्यापरि साथ तुझी ,
जणू सुंगांधित अत्तराची
अक्षय कुप माझी

किरणे उगवत्या सूर्याची
देई उत्साह प्रकाशमय ,
गुण तुझ्याकडून शिकावा
त्याग समईतील ज्योतीसम

रात्रीच्या निरभ्र आकाशात
शितलता चंद्राच्या प्रकाशाची ,
साथ मला द्यावीस
जशी सोबत नक्षत्रांची

✍️ श्री.विपुल आढाव ✍️

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

कवितेचे शीर्षक - स्वप्न सत्यात दिसेलच...

 कवितेचे शीर्षक - स्वप्न सत्यात दिसेलच...

बाबासाहेबांनी दलितांनाच नव्हे
तर सर्वांनाच माणसात आणलं ,
जातीयतेच्या नि असमानतेच्या
जात्यातील दुःख त्यांनी जाणलं...
न्याय आणि समतेच्या हक्कासाठी
लेखणीतून आचार - विचार मांडलं ,
दिवस - रात्र एक करून सर्वासाठी
घामाचं थेंब - थेंब सांडलं...
अशा बाबांना ओळखायला
खरं उशीर आम्हीच हो केला ,
आता विचार घेतलाय वाचायला
समज स्वतः घालतोय मनाला....
लिहून ठेवलं बरंच त्यांनी
समजायला पडेल आयुष्य कमी ,
हिंदूंचेच देव , दलितांचेच बाबा
यातच खरं अडकलो आम्ही...
वैचारिकतेचे बोट धरत सध्या
परिवर्तनाचं पाऊल पुढं टाकतोय ,
अजूनही वेळ गेलेली नाही
म्हणून बाबांना वाचू पाहतोय...
चालतंय सगळं त्यांच्या तत्वावर
एक दिवस असा असेलच ,
अपेक्षा नाही विश्वास आहे
पाहिलेलं स्वप्न सत्यात दिसेलच...

*✍️ श्री. विपुल उत्तम आढाव✍️*

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

कवितेचे शीर्षक - सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

कवितेचे शीर्षक - सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या ,
केवळ माझाच आवाज होता...

बोल माझे सारेच ऐकत ,
भावनांचा विचारांशी संवाद होता...

मनातील भावना शब्दांतून वाहता ,
व्यक्त होण्याचा नादच होता...

आज माझ्या विचारांच्या पिंजऱ्यातून ,
मनाच्या मुक्ततेचा वाद होता...

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या ,
तुमच्यापैकी कोणी साद देता...?

✍🏻 श्री. विपुल उत्तम आढाव✍🏻

बडबड गीत - एक होता कावळा

बडबड गीत - एक होता कावळा...

एक होती चिमणी
एक होता कावळा ,
कावळा होता काळा
तिचा रंग सावळा

चिमणी होती दयाळू
सर्वांसाठी ती कनवाळू ,
कावळ्याचा स्वार्थी स्वभाव
सद्गुणांचा भारी अभाव

चिमणी होती जिद्दी
करायची ती कष्ट ,
खोडकर होता कावळा
घरटे करायचा नष्ट

एक दिवस चिमणीला
समजला त्याचा प्रकार ,
पक्ष्यांच्या राजाला तिने
केली त्याची तक्रार

मोराने दिला आता
कावळ्याला मोठा दंड ,
आजपासून कावळ्याला
सर्वांचे घर बंद

शिक्षा ऐकून कावळा
लागला आता रडू ,
माफी मागायला
हात लागला जोडू

माफ कर ताई
कावळ्याचे एेकले बोल ,
परत नाही होणार
आता दार खोल

✍🏻श्री. विपुल उत्तम आढाव✍🏻

रविवार, १२ एप्रिल, २०२०

कविता - ज्ञानाचा दिवा लावला....

ज्ञानाचा दिवा लावला.....

११ एप्रिल १९२७ ला         
पुणे गावात येवूनी जन्माला
दिव्य रत्न आले पोटाला
गोविंदराव नि चिमणा बाईला  ||१||

या रत्नाचे ज्योतिबा नाव
एका वर्षातच मातृ प्रेमाचे
छत्रच जीवनातून हरवले राव
तेव्हाच दुःखाने घातला घाव ||२||

मावशी सगुणाबाई क्षीरसागर यांनी
घेतला विडा ज्योतीच्या पालनाचा
वडीलांपासून दूर थोडा राहिला
संबंध दुरावला नाही नात्याचा ||३||

सातवी पर्यंत घेतले सामान्यज्ञान
झेलतच समाजातील नाहक अपमान
ओळखू लागला गुण - दोष
जातियतेने त्याच्यावर ओढला रोष ||४||

ज्ञानाच्या जोरावर समजली उच्च - नीचता
विकासाच्या मार्गात येणारी बाधकता
मोडकळीस आणावी खोल अराजकता
समाजात हवी समानतेची साधकता ||५||

ओळखू लागला तो सामाजिकता
अनुभवत होता ज्ञानाची कमतरता
धर्माच्या नावाने होणारी भेदकता
जाणवे स्पष्ट रखरखीत दाहकता ||६||

याच दाहकतेने दिले धडे
वैचारिक लढ्यानेच परिवर्तन घडे
क्रांतीच्या लढ्याचे घातले घाव
वस्ताद लहुजी साळवे गुरूचे नाव ||७||

ब्रिटिशांच्या जुलूमाला विरोध करत
अन्याया विरुद्ध दाखवत राग
शस्त्र उचलून लढा देणारा
भेटला होता एक वाघ ||८||

सुरुंग लावला भेदभाव, जातीयतेने
ब्राम्हण मित्राच्या लग्न मिरवणुकीने
तेव्हाच शपथ घेतली ज्योतीने
स्वतःच परिवर्तन घडवू विद्येने ||९||

नसा - नसांत वाढत होता द्वेष
संसार करताना ज्योती - सावित्री
मात्र विचार करी एक
कशी पुसावी जातीयतेची रेष ||१०||

बदल घरातूनच करु म्हणाले
सवित्रीलाच विद्यार्थिनी म्हणून पाहिले
धडे परिवर्तनाचे शिक्षणातून गिरविले
शिकता - शिकविता दुःख साहीले ||११||

ज्योती होते जातीने माळी
जाळली अज्ञानाची फित काळी
आता फुलवला ज्ञानाचा मळा
उघडूनी मुलींसाठी पहिली शाळा ||१२||

थांबले नाही किंचित ज्योती
विरोध पत्करत फिरवे पाती
अस्पृश्यांच्या मनी पसरली ख्याती
अंधाराला लोटणारी दिव्याची वाती ||१३||

अखेर ज्योतीने युद्ध पुकारले
लढण्यास लेखणीचे शस्त्र स्वीकारले
टॉमस पेनच्या प्रभावी ग्रंथाने
समता, स्वातंत्र्य मूल्ये आत्मसात केले ||१४||

गुलामगिरी, सत्सार निबंध लिहीले
केली सत्यशोधक समाजाची स्थापना
शेतकऱ्याचा आसूड विस्तृत लिहून
मांडल्या शेतकरी , बहुजनांच्या यातना ||१५||

ग्रामीणतेला तंत्रविद्येचा आधार द्यावा
विकास साऱ्यांचाच करून पाहावा
लिहिला विचार सत्यधर्म पुस्तकात
लिहताना शरीरास झाला पक्षाघात ||१६||

विकलांग अवस्थेतच तत्त्वे लिहिली
एकतेची , समतेची स्वप्न पाहिली
अखेरीस अखंड रचना झाली
जिव्हाळ्याने ,रसाळ शब्दांनी वाहिली ||१७||

विरोध पत्करून आपुल्या कार्याने
इतिहासच जगासमोर कायम ठेवला
गुरूने ज्ञानाचा तर शिष्याने
संविधानाचा दिवा जगात लावला ||१८||

✍🏻श्री. विपुल उत्तम आढाव✍🏻

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

कविता - तो दगाबाज नव्हता

कवितेचे शीर्षक - तो दगाबाज नव्हता..

जगण्याला काही अंदाज नव्हता ,
माझाच मला आधार होता...

जगताना तळमळतेने मात्र हृदयाला ,
मनाने दिलेला आवाज होता...

धडपड त्याच्यासाठीच होती तरीही ,
जगताना स्वतः नाराज होता...

एकांतात नेहमीच स्वतः मात्र ,
स्वतःचेच प्रतिबिंब पाहत होता...

मनाचा विचारांशी वाद होता पण,
अंतर्मनात कधीच तो दगाबाज नव्हता...

✍🏻 श्री. विपुल उत्तम आढाव✍🏻

कविता - आता स्पष्ट कळतंय

कवितेचे शीर्षक - आता स्पष्ट कळतंय...

समाज म्हणजे खरंतर
माणसांनी गजबजलेलं असतंय,
संपूर्ण जगातच सध्या
विषाणूचं थैमान दिसतंय,⇁
त्यातच निरखून पाहिलं
आणि समजून आलं,
आज कुठंतरी माणसातलं
माणूसपण नष्ट होतंय..... ।।१।।

पंधरा - वीस घरांच्या अंतरावर
मृत्यूचं सावट स्पष्ट दिसतंय,
लढणारा धैर्याने लढतोय
मरणारा भीतीनेच मरतोय,
संसाराचं कोडं इथंच फसतंय
आणि समजून आलं,
आज कुठंतरी माणसातलं
माणूसपण नष्ट होतंय..... ।।२।।

अत्यावश्यक सेवेतून अनेकजण
जीवानिशी अजून खेळतंय,
गर्दीला आवर घालतच
सातत्यानं संपर्कात येतंय,
माणूस त्या कार्याला विसरतंय
आणि समजून आलं,
आज कुठंतरी माणसातलं
माणूसपण नष्ट होतंय..... ।।३।।

शासनाचं प्रयत्न अथक,
उभारलंय कित्येक पथक
माणूसच विरुद्ध वागतंय,
सुचनाचं पालन न करता
अनावश्यक कृतीच करतंय,
आणि समजून आलं,
आज कुठंतरी माणसातलं
माणूसपण नष्ट होतंय..... ।।४।।

सण-उत्सवाप्रमाणे जोशात
तोटे - फटाके उडवलं,
दुःखाच्या घरासमोर पण
'गो-कोरोना' म्हणून ओरडलं,
टिव्हीत बघताना - ऐकताना
मुक्यानं हृदय लय रडलं,
मनातच मन म्हटलं याच
भडक्यात माणूसपण जळलं....||५||

कुणाला दुःखाचं घर
पण नाही का समजलं ?
असाच विचार केला बहुतेक
"माझं नाही ना कुणी गेलं !"
असंच त्यांचं मत असावं,
तेव्हा स्पष्ट समजून आलं,
आज कुठंतरी माणसातलं
माणूसपण नष्ट झालंय..... ।।६।।

वाढत्या प्रमाणाला आता
रोखता येईल तसं रोखतंय,
घरातच बसणं योग्य पर्याय
लगेच नाही पण हळूहळू
कृतीतून पुढं वळतंय,
आणि समजून आलं,
आज कुठंतरी माणसाला
आता स्पष्ट कळतंय..... ।।७।।

परिणामांची तीव्रता पाहता
सारं दुःख जाणवतंय,
नव्या आशेनं - उमेदीनं
प्रत्येकजण कोरोनाला रोखतंय,
लवकरच आपल्या सर्वांची
यातून सुटका होईल याच
विश्वासानं माणूस जगतंय,
आणि मग समजून येईल
पुन्हा कुठंतरी माणसातलं
माणूसपण पूर्वीसारखं दिसतंय..... ।।८।।

*✍🏻श्री. विपुल उत्तम आढाव✍🏻*