शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

कविता - आता स्पष्ट कळतंय

कवितेचे शीर्षक - आता स्पष्ट कळतंय...

समाज म्हणजे खरंतर
माणसांनी गजबजलेलं असतंय,
संपूर्ण जगातच सध्या
विषाणूचं थैमान दिसतंय,⇁
त्यातच निरखून पाहिलं
आणि समजून आलं,
आज कुठंतरी माणसातलं
माणूसपण नष्ट होतंय..... ।।१।।

पंधरा - वीस घरांच्या अंतरावर
मृत्यूचं सावट स्पष्ट दिसतंय,
लढणारा धैर्याने लढतोय
मरणारा भीतीनेच मरतोय,
संसाराचं कोडं इथंच फसतंय
आणि समजून आलं,
आज कुठंतरी माणसातलं
माणूसपण नष्ट होतंय..... ।।२।।

अत्यावश्यक सेवेतून अनेकजण
जीवानिशी अजून खेळतंय,
गर्दीला आवर घालतच
सातत्यानं संपर्कात येतंय,
माणूस त्या कार्याला विसरतंय
आणि समजून आलं,
आज कुठंतरी माणसातलं
माणूसपण नष्ट होतंय..... ।।३।।

शासनाचं प्रयत्न अथक,
उभारलंय कित्येक पथक
माणूसच विरुद्ध वागतंय,
सुचनाचं पालन न करता
अनावश्यक कृतीच करतंय,
आणि समजून आलं,
आज कुठंतरी माणसातलं
माणूसपण नष्ट होतंय..... ।।४।।

सण-उत्सवाप्रमाणे जोशात
तोटे - फटाके उडवलं,
दुःखाच्या घरासमोर पण
'गो-कोरोना' म्हणून ओरडलं,
टिव्हीत बघताना - ऐकताना
मुक्यानं हृदय लय रडलं,
मनातच मन म्हटलं याच
भडक्यात माणूसपण जळलं....||५||

कुणाला दुःखाचं घर
पण नाही का समजलं ?
असाच विचार केला बहुतेक
"माझं नाही ना कुणी गेलं !"
असंच त्यांचं मत असावं,
तेव्हा स्पष्ट समजून आलं,
आज कुठंतरी माणसातलं
माणूसपण नष्ट झालंय..... ।।६।।

वाढत्या प्रमाणाला आता
रोखता येईल तसं रोखतंय,
घरातच बसणं योग्य पर्याय
लगेच नाही पण हळूहळू
कृतीतून पुढं वळतंय,
आणि समजून आलं,
आज कुठंतरी माणसाला
आता स्पष्ट कळतंय..... ।।७।।

परिणामांची तीव्रता पाहता
सारं दुःख जाणवतंय,
नव्या आशेनं - उमेदीनं
प्रत्येकजण कोरोनाला रोखतंय,
लवकरच आपल्या सर्वांची
यातून सुटका होईल याच
विश्वासानं माणूस जगतंय,
आणि मग समजून येईल
पुन्हा कुठंतरी माणसातलं
माणूसपण पूर्वीसारखं दिसतंय..... ।।८।।

*✍🏻श्री. विपुल उत्तम आढाव✍🏻*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा