रविवार, १२ एप्रिल, २०२०

कविता - ज्ञानाचा दिवा लावला....

ज्ञानाचा दिवा लावला.....

११ एप्रिल १९२७ ला         
पुणे गावात येवूनी जन्माला
दिव्य रत्न आले पोटाला
गोविंदराव नि चिमणा बाईला  ||१||

या रत्नाचे ज्योतिबा नाव
एका वर्षातच मातृ प्रेमाचे
छत्रच जीवनातून हरवले राव
तेव्हाच दुःखाने घातला घाव ||२||

मावशी सगुणाबाई क्षीरसागर यांनी
घेतला विडा ज्योतीच्या पालनाचा
वडीलांपासून दूर थोडा राहिला
संबंध दुरावला नाही नात्याचा ||३||

सातवी पर्यंत घेतले सामान्यज्ञान
झेलतच समाजातील नाहक अपमान
ओळखू लागला गुण - दोष
जातियतेने त्याच्यावर ओढला रोष ||४||

ज्ञानाच्या जोरावर समजली उच्च - नीचता
विकासाच्या मार्गात येणारी बाधकता
मोडकळीस आणावी खोल अराजकता
समाजात हवी समानतेची साधकता ||५||

ओळखू लागला तो सामाजिकता
अनुभवत होता ज्ञानाची कमतरता
धर्माच्या नावाने होणारी भेदकता
जाणवे स्पष्ट रखरखीत दाहकता ||६||

याच दाहकतेने दिले धडे
वैचारिक लढ्यानेच परिवर्तन घडे
क्रांतीच्या लढ्याचे घातले घाव
वस्ताद लहुजी साळवे गुरूचे नाव ||७||

ब्रिटिशांच्या जुलूमाला विरोध करत
अन्याया विरुद्ध दाखवत राग
शस्त्र उचलून लढा देणारा
भेटला होता एक वाघ ||८||

सुरुंग लावला भेदभाव, जातीयतेने
ब्राम्हण मित्राच्या लग्न मिरवणुकीने
तेव्हाच शपथ घेतली ज्योतीने
स्वतःच परिवर्तन घडवू विद्येने ||९||

नसा - नसांत वाढत होता द्वेष
संसार करताना ज्योती - सावित्री
मात्र विचार करी एक
कशी पुसावी जातीयतेची रेष ||१०||

बदल घरातूनच करु म्हणाले
सवित्रीलाच विद्यार्थिनी म्हणून पाहिले
धडे परिवर्तनाचे शिक्षणातून गिरविले
शिकता - शिकविता दुःख साहीले ||११||

ज्योती होते जातीने माळी
जाळली अज्ञानाची फित काळी
आता फुलवला ज्ञानाचा मळा
उघडूनी मुलींसाठी पहिली शाळा ||१२||

थांबले नाही किंचित ज्योती
विरोध पत्करत फिरवे पाती
अस्पृश्यांच्या मनी पसरली ख्याती
अंधाराला लोटणारी दिव्याची वाती ||१३||

अखेर ज्योतीने युद्ध पुकारले
लढण्यास लेखणीचे शस्त्र स्वीकारले
टॉमस पेनच्या प्रभावी ग्रंथाने
समता, स्वातंत्र्य मूल्ये आत्मसात केले ||१४||

गुलामगिरी, सत्सार निबंध लिहीले
केली सत्यशोधक समाजाची स्थापना
शेतकऱ्याचा आसूड विस्तृत लिहून
मांडल्या शेतकरी , बहुजनांच्या यातना ||१५||

ग्रामीणतेला तंत्रविद्येचा आधार द्यावा
विकास साऱ्यांचाच करून पाहावा
लिहिला विचार सत्यधर्म पुस्तकात
लिहताना शरीरास झाला पक्षाघात ||१६||

विकलांग अवस्थेतच तत्त्वे लिहिली
एकतेची , समतेची स्वप्न पाहिली
अखेरीस अखंड रचना झाली
जिव्हाळ्याने ,रसाळ शब्दांनी वाहिली ||१७||

विरोध पत्करून आपुल्या कार्याने
इतिहासच जगासमोर कायम ठेवला
गुरूने ज्ञानाचा तर शिष्याने
संविधानाचा दिवा जगात लावला ||१८||

✍🏻श्री. विपुल उत्तम आढाव✍🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा